KasaKay Marathi News.com

KasaKay Marathi News.com
🙏वाचकांनी आमच्या प्रयत्नांना योग्य न्याय द्यावा,हीच अपेक्षा🙏

वटपौर्णिमा कधी आहे? Vat Purnima 2023 : वटपौर्णिमा कथा, गोष्ट आणि महत्व

वटपौर्णिमा ( ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ) / Vat Pornima

वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुषी असल्याने, त्याची पूजा केल्याने, त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल व आपल्याला दीर्घ काळ सौभाग्य प्राप्त होईल, अशा श्रद्धेनं सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात, म्हणून या तिथीला ‘ वटपौर्णिमा’ असे म्हणतात.

वटपौर्णिमा तिथी

तारीख:03 जून 2023
वार:शनिवार
तिथीची सुरवात:03 जून 2023 रोजी सकाळी 11:17 पासुन.
तिथीची समाप्ती:04 जून 2023 रोजी सकाळी 09:11 पर्यंत.

पौराणिक कथा / वट सावित्रीची गोष्ट

पण वटवृक्षाची अशी पूजा सुरू होण्याचं पौराणिक कारण असं आहे की, मद्रदेशचा राजा अश्वपती याची एकुलती एक कन्या सावित्री, हिनं शाल्वदेशाचा पदच्युत राजा द्युमत्सेन याचा गुणवान व सत्यनिष्ठ मुलगा सत्यवान याला मनाने वरलं होतं. ही गोष्ट नारदमुनींच्या कानी जाताच ते तिला भेटून म्हणाले, “ सावित्री, ज्याच्याशी तू लग्न करू इच्छितेस, तो सत्यवान जरी अतिशय गुणवान असला, तरी एकतर त्याचा पिता द्युमत्सेन हा वृद्ध व अंध असून, त्याचे राज्य शत्रूने बळकावले असल्याने तो आपल्या कुटुंबियांसह वनात दिवस कंठीत आहे. त्यामुळे सत्यवानाशी तू लग्न केलेस, तर तुला वनातील खडतर जीवन जगावं लागेल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की, सत्यवानाला आजपासून बरोबर एक वर्षाने मृत्यु येणार आहे. तेव्हा अशा वनवासी व अल्पायुषी तरुणाशी लग्न करण्याचा विचार तू मनातून काढून टाक.” नारदमुनींचे हे सांगणे सावित्रीच्या आई-वडिलांनीही उचलून धरले व तिचे मन वळविण्यासाठी त्यांनी तिला बरेच सांगून पाहिले.

परंतु सावित्रीचे म्हणणे एकच “दुर्गुणी किंवा गुणाहीन पतीचा वैभवसंपन्न सहवास जरी दीर्घकाळ लाभला तरी त्या आयुष्याला गोडी नसते. याउलट सद्गुणी पतीच्या सहवासात जरी वनवास वाट्याला आला, तरी तो वनवासाची स्वर्गीय सुख देणारा होतो. शिवाय सत्यवान है जरी अल्पायुषी असले, तरी अतिशय गुणवान आहेत. तेव्हा त्यांची पत्नी होण्याचं जरी मला एक वर्षभरच सौभाग्य लाभलं, तरी त्या सुखद स्मृतींवर मी माझं उरलेलं आयुष्य समाधानात घालवीन. ” अखेर आपल्या कन्येचा तो दृढ निर्धार लक्षात घेऊन, सावित्रीच्या आई-वडिलांनी तिचं लग्न सत्यवानाशी लावून दिले. त्याच्या सहवासात सावित्री त्या वनातही अत्यंत आनंदात राहू लागली व आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांची सेवा करून त्यांनाही आनंद देऊ लागली.



ज्या दिवशी वर्ष पूर्ण होणार होते, त्या दिवशी सत्यवान यज्ञासाठी समिधा आणण्याकरिता हाती कुऱ्हाड घेऊन लगतच्या वनात जायला निघाला. सावित्रीने त्याला नारदांनी वर्तविलेल्या भविष्याची कधीही कल्पना दिली नव्हती. काही अंतर चालून गेल्यावर दृष्टीस पडलेल्या एका वडाच्या झाडावर सत्यवान चढला, आणि समिधांसाठी तो हातातल्या कुऱ्हाडीने त्या वडाच्या बारीक बारीक फांद्या तोडू लागला. तेवढ्यात मूर्च्छा येऊन तो त्या वृक्षाखाली पडला.

सावित्रीने त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं व ती त्या वडाच्या एका छोटया फांदीनं आपल्या पतीला वारा घालू लागली. ईश्वराची उत्कट भक्ती वर्षानुवर्षे केल्यामुळे प्राप्त झालेल्या तिच्या दिव्य दृष्टीला यम आपल्या पतीचे प्राण न्यायला आलेला दिसला. तेव्हा हात जोडून ती म्हणाली, “यमदेवा, माझ्या पतीचे प्राण नेऊ नका. आपल्या लेकीवर एवढी कृपा करा.”

तिचं ते आर्जवी बोलणं ऐकून यम तिला म्हणाला, “मुली, तू हे एक मागणं सोडून इतर कुठल्याही दोन गोष्टी माझ्याकडे माग. मी त्या तुला देईन. सावित्री म्हणाली, “यमदेवा, माझ्या आई-वडिलांना मुलगा नाही. तेव्हा त्यांना एखादा गुणवान, बुद्धिवान व दीर्घायुषी मुलगा व्हावा.”

यमदेवाने ‘ तथाऽस्तु ! ‘ म्हणताच सावित्री म्हणाली, “आणि माझे दुसरे मागणे हे आहे की, राज्यावर बसलेल्या माझ्या सासऱ्यांना आपला नातू पहायला व खेळवायला मिळावा.”

‘तथाऽस्तु ! ‘ म्हणून यम सत्यवानाचे प्राण घेऊन चालू लागला असता सावित्रीने विचारलं, यमदेवा, तुम्ही मला दोन वर दिले असताना माझ्या पतीचे प्राण घेऊन कसे काय जाता?

यम म्हणाला, ” हे मुली, मी वर दिल्याप्रमाणे तुझ्या आई-वडिलांना मुलगा होईल आणि तुझ्या अंध सासऱ्यांना दृष्टी येऊन गेलेले राज्य परत मिळून, त्यांना योग्य वेळी नातवंडेही पाहायला आणि खेळवायला मिळतील.

सावित्रीने विचारले, “ पण यमदेवा, माझे पती हे माझ्या सासू-सासऱ्यांचे एकटेच पुत्र असताना व त्यांना दुसरा मुलगा वा मुलगी नसताना, त्यांचे प्राण असे हरण केल्यास माझ्या सासऱ्यांना नातवंडं कसे पाहायला व खेळवायला मिळणार ?”

सावित्रीने मागितलेला दुसऱ्या वराला ‘ तथाऽस्तु ! ‘म्हणजे’ तसे होवो ! ‘ असे म्हणण्यात आपण चूक केली, ही गोष्ट यमाच्या लक्षात आली. पण तिच्या पतीनिष्ठेचे व चातुर्याचे कौतुक वाटून, त्याने मंत्र म्हणून आपल्या हाती असलेले सत्यवानाचे प्राण त्याच्या कुडीत घातले व त्याला जिवंत केले आणि तिच्या स्वाधीन केले.

ही घटना ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला त्या वडाखाली घडली, म्हणून तेव्हापासून या तिथीला सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करू लागल्या व आपल्या पतीला दीर्घायुष्य मागू लागल्या. बंगालमधील सुवासिनी मात्र वटवृक्षाऐवजी आपल्या पतीची पूजा करतात व त्याला एक वडाची छोटी फांदी अर्पण करतात.

Post a Comment

0 Comments